Friday, November 15, 2019

अंदमान-निकोबार येथे कायकाय पहाल ?

❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄

 ★★अंदमान-निकोबार येथे कायकाय पहाल ?★★

====+====+===================+=



                काल माझ्या ग्रुप वर अंदमान-निकोबार ट्रीप कशी करावी? यासंदर्भात विचारणा झाली। यासाठी हा लेखन प्रपंच......!
        आता या ट्रिपला जायचं म्हटलं की, सर्वप्रथम प्रश्न पडतो जाणार कसं ? 
                 यासाठी आपल्याला दोन मार्ग आहेत।  प्रथम मार्ग सागरी जलप्रवास। दुसरा मार्ग हवाईमार्ग।
               मुंबईतून प्रथम रेल्वेने चेन्नई येथे जावे लागेल । तेथून मग तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांच्या क्रुज मिळतील। त्यातून तुम्ही 70 तासात पोर्ट ब्लेअरला पोचू शकता । हा झाला समुद्री मार्ग ।
            आता हवाईमार्ग पाहू । आपल्याला मुंबईतून गो एअर व इंडिगो या दोन कंपन्या स्वस्तात नेऊ शकतात। साधारण जाण्याचे तिकीट आठ ते नऊ हजार दरम्यान असेल ।येण्याचे पण तेवढेच असेल।  मुंबईहून विमानाने निघाला तर सहा ते सात तासांमध्ये पोर्टब्लेअर पोचू शकतात। आपण आधीच ऑनलाईन बुकिंग केलेले असेल तर,  सरळ मुक्कामाला हॉटेलमध्ये जावे।
                दुसऱ्या दिवशी सकाळी प्रथम आपणास सेल्युलर जेल पाहायला जायचे आहे ।  1857 च्या उठावा नंतर इंग्रजांनी ही सेल्युलर जेल तयार केली। येथे ठेवण्यात येणाऱ्या कैद्यांना ही काळ्यापाण्याची शिक्षा होती।  कारण चारही बाजूंनी समुद्राने वेढलेली जागा...!   
            ज्यावेळी इमारत तयार केली गेली, त्या वेळेला सात वेगवेगळ्या इमारती होत्या। तसेच 696 सेल होते। स्वातंत्र्यानंतर फक्त आता तीन इमारती दिसतात।  इथे प्रत्येक कैद्याला पौंड 30 नारळाची किंवा मोहरीचे तेल काढावे लागत असे।  नाहीतर अमानुष मारहाण होत असे। ही इमारत तयार करायला त्यावेळी पाच लक्ष रुपये लागले होते ।या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर शेवटची कोठडी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आहे। तसेच तुम्ही कैद्यांना फाशी देण्याची जागा पण येथे पाहू शकता।येथील संग्रहालयात तो कोलहू, इतर त्रास देण्याची शस्त्रे पाहू शकता। अश्या प्रकारे आपण वेगवेगळ्या आठवणी मनात घेऊन बाहेर पडतो। या ठिकाणी आपल्याला संध्याकाळी 6:00 वाजता यायचे आहे। इथे एक साऊंड अँड लाईट शो आहे।याचे तिकीट50 रुपये आहे। 6 व 7:30 असे दोन शो असतात। एक हिंदी तुन व दुसरा इंग्रजी तुन असतो।ते पाहून मन तृप्त होईल।
        यानंतर आपल्याला अंथरपोलॉजीकल संग्रहालय पहायला जायचे आहे । हे संग्रहालय इथल्या वेगवेगळ्या जमातीच्या इतिहासाशी निगडित आहे। हे संग्रहालय 1975 साली सुरू झाले। येथे तत्कालीन जमातीचे कपडे, शस्त्र, कला, इतर कृती पाहायला मिळतात। एकदा आवर्जून भेट द्यावी असे ठिकाण...!
         या नंतर सागरी जीवजंतू ची माहिती देणारे सामुद्रिका संग्रहालय पहायचे आहे। वेगवेगळे सागरी जीव पाहुन मन खूश होऊन जाईल। त्यानंतर इथे एक अंदमान जमती ची माहिती देणारा एक शो आहे । तो पण पाहू शकता।
              या नंतर तुम्ही आजून एक संग्रहालय पाहू शकता। झुओलॉगिकल संग्रहालय होय। येथे तुम्ही वेगवेगळ्या प्रवाळची माहिती घेऊ शकता। या ठिकाणी वेगवेगळ्या स्पंज , फुलपाखरे, वेगवेगळ्या गोम पाहायला मिळतील। येथील मत्यसंग्रहालय मध्ये वेगवेगळ्या माश्यांच्या जाती पाहायला मिळतील।
         यानंतर तुम्ही पोर्ट ब्लेअरला आजून दोन बाबी पहायच्या आहेत। चॅथम सॉ मिल व महात्मा गांधी नॅशनल मरीन पार्क।
            येथून 5 किमी अंतरावर चॅथम बेटावर ही लाकडाची वखार आहे। 1883 साली ही वखार चालू झाली होती।परंतु दुसऱ्या महायुद्धात ती नष्ट झाली होती। त्यानंतर ही 1950 साली पुन्हा चालू केली। ह्या मिलचे एवढे महत्त्व आहे की, ही एकमेव आहे। येथे मिळणारे लाकडाला पदौक लाकूड म्हणतात। हा येथील राजवृक्ष आहे। तो 120 फूट उंच वाढतो। येथे याची वने पाहून मन प्रफुल्लित होते। हे लाकूड आपल्याकडील सागवानी लाकडापेक्षा मजबूत असते।  ही वने सर्व प्रकारच्या लाकडी वस्तू साठी लाकडाचा पुरवठा करतात। जसे इमारती लाकूड, बांधकाम लाकूड, शोभेच्या वस्तू साठी लाकूड।
             आता महात्मा गांधी पार्क कडे जावे लागेल। हे एकुण 15 बेटांचे मिळून बनलेले आहे। हे पोर्ट ब्लेअर पासून 30 किमी लांब आहे। हे उद्यान प्लास्टिक मुक्त आहे। त्यामुळे येथे बाटली बंद पाणी नेण्यासही मनाई आहे। येथे आपल्याला दोन माणसासाठी एक वॉटर बॅग मिळते। पण त्यासाठी 200रुपये डिपॉझिट द्यावे लागेल। आपल्या बाटल्यांतील पाणी त्यांत ओतून घेऊन त्या बॅगाच बेटावर नेऊ दिल्या जातात। बाटलीबंद पाण्याच्या बाटल्या वंडूरलाच सोडून द्याव्या लागतात। इथे होणारी प्लॅस्टिकच्या पिशव्यांकरताची तपासणी एवढी इत्थंभूत असते की काही व्यक्ती मुद्दाम किंवा चुकून आणलेल्या बाटल्या येथेच सोडून जातात किंवा जावेच लागते। येथून आपल्याला छोट्या होड्यांतून जॉली बॉय बेटाकडे जावे लागते ।बेट खरेच खूप सुरेखच आहे। अगदी दृष्ट लागण्यासारखे। या प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे ही बोट खालून काचेची असते। मग त्यातून समुद्र पाहून मन तृप्त होते। खरे स्वर्गात असल्याची अनुभूती प्राप्त होते। याकरिता तिकीट मात्र 400 रुपये पडेल।
      वरील सर्व पाहे पर्यंत तीन दिवस संपतील। येथे आपले पोर्ट ब्लेयर पाहून संपते।
         यानंतर नंबर लागतो तो हॅवलोक बेटाचा। संपूर्ण दिवस लागतो येथे। हे अंदाजे 60 किमी लांब आहे पोर्ट ब्लेअर पासून। फेरीने यावे लागते। येथून जाण्यासाठी सकाळी 6 , 8 व 12:30 वाजता फेरी आहे। भाडे 1500 रुपये प्रति व्यक्ती जाण्यासाठी व येण्यासाठी 1500 रुपये प्रति व्यक्ती असते। येण्यासाठी 3 वाजता दोन फेरी आहेत व 4 वाजता एक फेरी आहे। यानंतर आपलीआपली सोय पहावी लागते। यांचे दर एवढे आहेत, तर स्वतंत्र दर किती ...?
बर असो। आशियातील सर्वात सुंदर बीच आपल्याला येथे राधानगरी पाहायचा आहे। यानंतर आपण आपला मोर्च्या वळवायचा तो एलिफंटा बीच कडे। येथे तुम्ही हत्तींना त्रैनिंग देताना पाहू शकता। यानंतर येथे दोन बाबीपैकी एक बाब आवर्जून करावी। एक स्कुबा ड्राइविंग किंवा सी वॉक । दोन्ही साठी 3500 रुपये लागतील। एकूण 7000 रुपये जातील दोन्हीसाठी। यात मला तर सी वॉक जास्त आवडते। तुम्ही जेव्हा समुद्रात उतरता तेव्हा 5 जणांसाठी एक ट्रेनर असतो। त्यामुळे घाबरून जायचे नाही।
         पाचव्या दिवशी तुम्ही रॉस आईसलँडला भेट द्यावी। याचे नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस बेट केले आहे। येथे तुम्ही the lone sailer memorial पाहू शकता। तसेच Netaji Subhas Chandra Bose Island Graveyard हे सुद्धा पाहू शकता।
             यानंतर बारतंग बेट पाहू शकता। या बेटावर चुनखडीच्या गुंफा खूप पाहण्यासारख्या आहेत। येथे छोटे छोटे ज्वालामुखी देखील पाहु शकता। जवळच पॅरोट आईसलँड आहे। तेथे फक्त पोपटाचे साम्राज्य आहे। येथील पोपटांना शेपूट लांब असते। खूप नयनरम्य देखावा असतो तो।
            अश्या प्रकारे हे 5 ते 6 दिवस होतात। फेरीने जाणे साठी 70 तास व येणे साठी 70 तास मिळून 140 तास होतात। साधारण 6 दिवस होतात। एकूण 12 दिवसाची ही ट्रिप होईल।
जाण्यासाठी योग्य वेळ फेब्रुवारीचे शेवटचे दोन आठवडे व मार्चचे पहिले दोन आठवडे योग्य आहेत। इतर वेळी गेलात तर पाऊस व वातावरण मुळे जाऊनसुद्धा हॉटेलमध्ये बसून राहावे लागेल।
     
🐋🐋🐋🐳🐳🐳
 


No comments:

Post a Comment