Thursday, May 31, 2018

काजवा महोत्सव, राधानगरी।

        ३० मे रोजी कोल्हापूर ला जायचे ठरले होते। सकाळी कोल्हापूर-नागपूर ट्रेन पकडली। २ वाजेपर्यंत कोल्हापूर मध्ये पोचलो। तीन-चार दिवस मुक्काम होता । मग काय पाहायचे ? असा विचार मनामध्ये होताच। बराचसा भाग पाहून झाला होता। त्यामुळे मी गोंधळात होतो। सहज भटकंती ग्रुप चाळत होतो। काय सापडते का ? हाच उद्देश। मग आडवाटेवरचे कोल्हापूर हि पोस्ट पहिली। तिची माहिती मिळवली।२७ मे ला हि सहल संपली होती। आता काय ? प्रश्न उभा। मागच्या पोस्ट मध्ये काजवा महोत्सव हि पोस्ट नदाफ सरांनी टाकली होती। मग हेच कायम केले।
            मी एकटा कधीच जात नाही। शक्यतो पत्नी बरोबर असावी , असा माझा शिरस्ता आहे। म्हणून फोन करून विचारले। तिकडून नकारघंटा मिळाली। आता दुसरा मार्ग अवलंबला। आपल्या व्हाट्सअप्प ग्रुप वर पोस्ट टाकली कोण येणार आहे का ? कोणाचाही प्रतिसाद नाही। मग शेवटी उपाय म्हणून नदाफ सरांना फोन केला, ' तुम्ही येणार का ?' त्यांना दुसरे काम असलेने त्यांचेही उत्तर नाही असेच होते। शेवटी एकट्यानेच जायचे ठरवले।
                  एकटाच जाणार असल्याने कारची गरज वाटली नाही। सरळ स्कुटी घेतली आणि निघालो। माझा हा निर्णय चुकीचा होता। हे पुन्हा सिद्ध झाले। पण नाईलाज होता।
                   कोल्हापूर तर राधानगरी हे अंतर ५० किमी पेक्षा जास्त नव्हते। जायला दीड तास लागेल असे वाटले होते। पण सभोवताचा निसर्ग पाहून गाडीचा वेग काय वाढला नाही। जाताना दोन मंदिरे लागली । प्रथम दत्त मंदिर व नंतर अंबाबाई मंदिर। गडबड व जायची घाई असलेले दत्त मंदिरात पाया पडून लगेच निघालो। फारसे काही पहिले नाही।
              पुढे गेल्यावर मात्र उगीच चुकल्यासारखे वाटले। फोटो नाही, बारीक निरीक्षण नाही, मूर्ती पण नीट आठवत नव्हती। असे कधीच झाले नाही। माझ्या या कृतीचा धिक्कार मीच मनातल्या  मनात केला।
                यानंतर मात्र अंबाबाई मंदिरात असे केले नाही। हे मंदिर मुख्य रस्ता चिटकून उभे होते। एका बाजूला सरळ डोंगर कोरलेला होता। आत प्रवेशासाठी कमान वैगेरे काही नव्हती। तरीपण समोरचे मंदिर खूप सुंदर दिसत होते। सभामंडप आताच्या काळातील सिमेंट काँक्रीट चा होता। त्यावर नक्षीकाम असे काही नव्हते। सरळ धोपट स्लॅब होता। गाभाऱ्या कडे जाताना सिंहाची मुर्ती विलोभनीय होती। अंबाबाई ची मूर्ती मात्र जुनी ,प्राचीन असल्या सारखी वाटली। दर्शन घेतले। बाहेर आलो। पुढील मार्गस्थ झालो।
              घरून मी सव्वा पाच नंतर निघालो होतो। त्यामुळे आता दिवस मावळू लागला होता। त्याच वेळेला मी घाट चढत होतो। घाटाच्या कडेला पायऱ्या पायऱ्या केलेल्या दिसत होत्या। त्या काय असा प्रश्न होताच। विचारायचे कुणाला हा प्रश्न होताच। कारण रस्त्याने जाणार मी एकटाच होतो। वेगवेगळ्या गाड्या, कार, टिप्पर येत होते।पण थांबत नव्हते कोणी। थांबवून विचारायचे तरी कसे ? थोडे पुढे गेल्यावर एकजण निवांत बसलेले दिसले। ते बहुतेक जेसिबीचे चालक असणार असा माझा अंदाज होता। कारण जेसीबी जवळच उभा होता। काहीही असो , आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळवणे हेच मनात होते। त्यांना विचारल्यावर कळले कि , हि पायऱ्या पायऱ्यांची शेती आहे। इथे भाताचे पीक घेतले जाते। आता उन्हाळा असलेने ते रिकामे आहे।
           ही माहिती घेऊन मी पुढे गेलो। घाटमाथ्यां जवळ असण्याची शक्यता असेल। कारण तेथून सूर्यास्त खूपच छान दिसत होता। अतिशय विलोभनीय निसर्गाची किमया मी पाहत होतो। जणू काय महाबळेश्वर किंवा दुसऱ्या सनसेट पॉईंटवरच उभा आहे। विशेष म्हणजे आता उन्हाळा असला तरी थंडीची जाणीव होत होती। समोरच्या डोंगराला धुक्याची चादर ओढताना मी जवळून पाहत होतो। हळूहळू धुक्यामुळे बराचसा भाग दिसेनासा झाला। मीही भान हरपून पाहत आहे, याची जाणीव झाली।
                 थोडे पुढे गेलो कि , काजवा महोत्सव कडे असे बॅनर दिसले। राधानगरी शहर येथून ६ किमीच्या पुढे होते। आता प्रश्न पडला शहरात जायचे काय?
             याची तजवीज मी दुपारीच करून ठेवली होती। मी सम्राट सर, काजवा समिती सदस्य यांना फोन केलेला होता। मी येणार आहे अशी कल्पना दिलेली होती। लगेच त्यांना दुसरा फोन करून खात्री केली। तेथूनच जायचे होते। शहरात जायची गरज नव्हती। तेथून चार किमी आत गेलो। पोलीस बॅरिगेट पासून कच्च्या रस्त्याने दीड किमी आत गेल्यावर पाच सात गाड्या दिसल्या। मग मात्र हायसे वाटले। कारण तो घनदाट झाडीचा परिसर होता। दिवसा सुद्दा उन्हाला जमीन दिसायची कमतरता। मग सम्राट सर यांची ओळख करून घेतली। काजवांची माहिती घेतली। आजूनही वेळ शिल्लक होता। म्हणून सरांच्या निर्देशाने काळम्मावाडीचे धरण पाहण्यास निघालो। वाटेत पन्हाळा चे काटकर भेटले। त्यांनाही धरण पाहण्यास घेतले। २ किमी गेल्यावर धरणाजवळ पोचलो। सन २०११ पासून धरणावर जाण्यास बंदी आहे हे समजले। माझी निराशा झाली। जरा खालच्या बाजूस जाऊन धरण पहावे लागले। याचे नाव दूध गंगा धरण होते। धरण मध्यम आकाराचे होते। पण खूपच भोवताली जंगल होते। परत काजव्यांकडे आलो। साधारण ७ ते ८:३० पर्यंत काजवे पहिले। काजव्यांचे फोटो काढता आले नाहीत हि सल मनात आहे।
             साधारण दीड तास काजवे पहिले। सम्राट सरांनी दाखवलेला रोडने मी काजवे पाहत होतो। मी ७००ते८००मीटर आत गेलो ,हे कळलेच नाही। माझ्या बरोबरची माणसे कधीच मागे पडली होती। मग मात्र मी मागे आलो। जेवढा अंधार असेल तेवढा निसर्गाचा चमत्कार पूर्ण क्षमतेने दिसायचा। एक काजवा मी पकडला सुद्धा। त्याच्या शरीराच्या शेवटच्या भागातून हा प्रकाश येतो। यात कोणत्याही ऊर्जेचा अपव्यय होत नसल्याने हा शीतल किंवा शांत प्रकाश होय। काजव्यांच्या पोटात असलेल्या लुसिफेरान रसायनांचा हा प्रताप आहे हे नंतर कळले।
               आता मात्र घरून फोन यायला लागला होता। मी जावई आहे ,याची जाणीव फोनने झाली। मी स्कुटीकडे निघालो, तेव्हा रुपेश सरांनी थोडे थांबून जा, असे सांगितले। कारण पुढे गवा दिसला आहे। थांबून मी एका कारच्या मागेमागे पाच किमी आलो। सगळे डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य डोळ्यात साठवून घर गाठले।




















No comments:

Post a Comment