Monday, May 28, 2018

श्री क्षेत्र नीरानरसिंगपूर,पुणे।

                      काल कार्यक्रमासाठी अकलूजला जायचा योग आला। मी पण काही कमी नव्हतो, आलेल्या संधीचा भरपूर फायदा घ्यायचे ठरवले। सकाळी लवकरच निघालो। जाताना नीरानरसिंगपूर करायचे पक्के केले। सकाळी 10 वाजता बरोबर तेथे पोचलो।
                    गावात जाताना वाटेत एक पूल लागतो। अतिशय सुरेख पूल असा त्याचा रुबाब होता। पुलाच्या दोन्ही बाजूच्या स्ट्रीट लाईट तर परदेशात असल्या सारख्या होत्या। खूप आवडला पूल!
                 मग पुलाला वळसा घालून गावात प्रवेश केला। आधी स्वच्छता कर पावती फाडली, मगच पुढे जाता आले। थोडे अंतर गेल्यावर खुप उंचीवर देऊळ दिसले। वर जाण्यासाठी किमान 100 पायऱ्या चढाव्या लागतात। पायऱ्यांच्या पायथ्याशी उजव्या बाजूला नीरा नदीत उतरण्यासाठी घाट आहे। घाट दगडी बांधकाम केलेला आहे। हे पाहून मी मंदिराकडे निघालो। आत जाताच एक मोठी घंटा दिसली। घंटा वाजवायचा रॉड नसल्यामुळे ती सध्या बंद आहे। थोडे पुढे गेले कि मंदिराचा सभा मंडप आहे। तोही सागवानी लाकडाचा !! तसेच हा मंडप दोन मजली आहे। मंडपातून चार पायऱ्या वर गेल्यावर श्रीची मूर्ती कडे जावे लागते। पण त्याअगोदर मी त्याप्रवेश कमानी कडे पहिले। खूप बारीक नक्षीकाम केले आहे त्यावर। आत गेल्यावर दगडी सभामंडप लागतो। येथून मोबाईल बंद करावा लागतो। सुबक नक्षीदार रचनाच आहे त्या दगडी मंडपाची ! मग दर्शन घेतले। बाहेर आलो। तर समोर भक्त पुंडलिकाचे छोटे मंदिर, तेही अगदी श्रींच्या सामोरा समोरच!
             मग लाकडी सभा मंडप बारकाईनं पहिला। याचे खांब दगडी आधारावर अगदी निश्चलपने उभे होते। कोठेही वाळवीचा प्रादुर्भाव दिसला नाही। मग जवळच काचेच्या पेटीत ठेवलेल्या गरुड मूर्ती कडे लक्ष गेले। नक्षीदार रचना, कोरीवपणा, रुबाबदार अशी मूर्ती होती। या मूर्ती ची कार्तिक चतुर्दशी गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येत असे। कालांतरानं याची झीज झाली। व हा उत्सव बंद पडला।पण या मूर्तीचे पुनरुज्जीवन करून या काचेच्या पेटीत ठेवण्यात आली। हि मूर्ती तांदूळ व गव्हाच्या काड्या, लाकडी भुस्सा, कागद तुकडे, सुती कापड व डिंक यापासून तयार केलेली आहे। ही मूर्ती सन १८०० मध्ये या भागाचे संस्थानिक विंचूरकर यांनी आंध्रप्रदेश येथील कंपली या गावातून तयार करवून घेतली आहे। या मूर्तीवर संवर्धनसाठी लाखेचा पातळ थर देण्यात आला आहे। अशी जुनी मूर्ती पाहून मन थक्क झाले।
                  यानंतर मी मंडपाच्या बाहेर आलो। मंदिराच्या सुशोभिकरणाचे काम चालू होते ते पहिले। शिखराच्या निम्म्या भागाला गिलावा करण्यात आला होता। सहज कुतूहल म्हणून मी या गिलाव्याला कोणते सिमेंट वापरले असे विचारले। उत्तर ऐकून थोडा वेळ शिखराकडे पाहत होतो। हा गिलावा सिमेंट मध्ये करत नसतात। त्याऐवजी चुना व अतिशय बारीक वाळू याचे मिश्रण वापरतात।तो एकजीव करायला एक मशीन वेगळी होती। त्या मशीनचा गोल फिरणारा लोखंडी भाग अंदाजे 300 किलोचा असेल। याच्या खाली वाळू व चुना रगडून बारीक केले जात होते। मग तो पातळ पदार्थ गिलाव्यासाठी वापरला जात होता। याला १०० वर्ष काहीही होणार नाही असे सांगितले गेले। तिथे मंदिराच्या भोवती दगडाचे पेविंग ब्लॉक्स बसवायचे होते। तेथे आलेले कारागीर मन लावुन काम करीत होते। त्यातले एक वयस्कर धोत्रे मामा होते। त्यांना विचारले या वयात कसे काय? त्यांच्या म्हणण्यानुसार घरी बसून काय करणार ? त्यांचा एक फोटो मी संग्रही ठेवण्यासाठी घेतला।
             यानंतर मी संगमा कडे जायचा विचार केला। बाहेर आल्यावर जुजबी चौकशी केली। संगम ५०० मीटर अंतरावर आहे असे कळले। संगमावर २० मिनिटात पोचलो। येथे भीमा व नीरा या दोन नद्यांचा संगम होतो। भीमा हि मोठी व त्यामानाने नीरा छोटी नदी। उन्हाळा असल्यामुळे दोन्ही कोरड्या होत्या। घाटावर दोन ठिकाणी दिवसाची पूजा होती। ती पाहून शेवटी कोणीही आपले नसते,ही बाब मनाला चटका लाऊन गेली।
           भीमा नदीच्या पात्रात थोड्या अंतरावर जेसिबी, पोकलंड, टिप्पर अजूनही काही यंत्रे होती। त्यासंबंधी चौकशी केल्यावर कळले कि ,तेथे एक मोठा बंधारा होणार आहे।त्यासाठी हि धावपळ होती। कारण महिन्यात नदीला पाणी येणार होते। पाणी साठणार या जाणिवेने मन सुखावह झाले। मी जड मनाने पुढे निघालो।















No comments:

Post a Comment